सावंतवाडी : शहरातील शिरोडा नाका येथील वृंदावन सोसायटीसमोर गव्यांचा कळप थेट मुख्य रस्त्यावर आल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर गव्यांचे दर्शन झाल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली होती.
सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे नागरिक कामासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी वृंदावन सोसायटीसमोरील रस्त्यावर गव्यांचा कळप अचानक दाखल झाला. यावेळी काहींनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तर वाहनचालकांनी आपली वाहने जागीच थांबवून ठेवली.गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात गवे आता थेट नागरी वस्तीत येऊ लागल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रानगव्यांचा वनविभागाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच शहराच्या वन हद्दीवर कुंपण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.












