राजापूर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा विळखा

अनधिकृत पार्किंग, रिक्षा स्टँड आणि अतिक्रमणामुळे नागरिक हैराण

राजापूर प्रतिनिधी : शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. बाजारपेठ परिसरात दुकानदारांकडून दुकानांसमोरच वाहनांची पार्किंग केली जात असून, ग्राहकांची वाहनेही रस्त्यालगत उभी राहत असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत आहे. शहरातील या वाहतुक कोंडीच्या गंभीर प्रश्नाबाबत पोलिस आणि नगर परिषद प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकते असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या रस्त्यावरिल वाहतुक कोंडी हा विषय नित्याचाचा झाला आहे. मात्र शहरातील बाजारपेठ रस्त्यावर अनेक दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन करून दुकाने पुढे थाटली जात असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पायी चालतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनांना रस्ता मिळत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
विशेष म्हणजे बाजारपेठेतील काही अंतर्गत मार्ग वन-वे घोषित असतानाही वाहनचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. परिणामी अनेकवेळा रस्त्यावर गोंधळ आणि कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने राजापुरात दाखल झाले आहेत. घरगुती खरेदीसाठी शहरात येणाऱ्या वाहनधारकांना पार्किंगची योग्य माहिती अथवा सुविधा उपलब्ध नसल्याने बाजारपेठ परिसरात वाहतूक विस्कळीत होत आहे.
शहरभर ‘नो पार्किंग’; पण पार्किंगची सोय कुठे?
राजापूर नगर परिषद प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक उभारले असले तरी नागरिकांसाठी पर्यायी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात अपयश आल्याची टीका होत आहे. त्यामुळे वाहनधारकांपुढे वाहन उभी करावीत तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनधिकृत रिक्षा स्टँडचा सुळसुळाट
राजापूर शहरातील जवाहर चौक ते चिंचबांध या शिवाजी पथ मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व प्रवासी रिक्षांचे अनधिकृत स्टँड उभे राहिल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. उपलब्ध माहितीनुसार, रत्नागिरी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून शहरात अधिकृतपणे एकच रिक्षा स्टँड मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात शहरात १० ते १२ ठिकाणी अनधिकृत रिक्षा स्टँड सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे वाहन पार्किंगसाठी जागेची मोठी समस्या निर्माण झाली असून शहरवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गुरुवारी आठवडा बाजारादिवशी समस्या अधिक गंभीर
शहरातील गणेश घाट परिसरात नगर परिषदेकडून लाखो रुपये खर्च करून पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र दर गुरुवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार याच जागेत भरत असल्याने पार्किंगसाठी उपलब्ध जागा कमी पडते. त्यातच या परिसरात अनधिकृत रिक्षा स्टँड वाढल्याने गुरुवारी शहरातील वाहतूक आणि पार्किंग समस्या अधिकच बिकट बनत आहे.
दरम्यान, बाजारपेठ रस्त्यावर वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अतिक्रमणांवर कारवाई करावी, अनधिकृत रिक्षा स्टँड हटवावेत तसेच शहरात नियोजनबद्ध व कायमची पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.