​सावंतवाडीत अवकाळीचा हाहाकार; विजांच्या कडकडाटासह मुसळधार

आंबा बागायतदार आणि व्यापारीही हवालदिल

​महावितरणचा भोंगळ कारभार; वीज गुल झाल्याने ग्राहकांचा संताप

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्याला शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले. सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली. या अस्मानी संकटामुळे आंबा, काजू आणि हंगामी फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, पावसासोबतच महावितरणच्या लहरी कारभारामुळे सावंतवाडीकर पुरते हैराण झाले आहेत.

​ ​गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे कोकणचा राजा असलेल्या आंब्याचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला आंबा आणि बागेतील तयार फळे पावसामुळे खराब होण्याची भीती निर्माण झाल्याने बागायतदार आणि व्यापारी चिंतेत आहेत. केवळ आंबाच नव्हे, तर काजू, जांभूळ, फणस आणि कोकम यांसारख्या हंगामी पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ऐन मे महिन्याच्या उन्हात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

​शहरात चिखलाचे साम्राज्य; अपघाताची भीती
​शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रस्ते निसरडे झाले असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ते कामाच्या ठिकाणी चिखल झाल्याने अपघात टाळण्यासाठी वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

वेत्ये येथे माडावर पडली वीज
​तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. वेत्ये येथे एका माडावर वीज पडल्याने माडाने पेट घेतला, यात माड जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

​महावितरणचा ‘शॉक’: पाऊस पडण्यापूर्वीच अंधार
​आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला की वीज गायब होण्याचा नवा ‘नियम’ महावितरणने लागू केल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. आधुनिक युगातही साध्या पावसाळी वातावरणात वीज यंत्रणा कोलमडत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
सायंकाळच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला, तर परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला.

​नियोजन शून्य कारभार: उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळण्याऐवजी अंधाराचा सामना करावा लागला.