सावंतवाडी येथे खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न
शेतकऱ्यांची सेना उभी करण्यासाठी काम करण्याच्या सूचना
सावंतवाडी । प्रतिनिधी :कोकणातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण उद्धार करणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदतीची आवश्यकता असून, येणाऱ्या अस्मानी संकटांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने ठोस नियोजन करावे. शेतकऱ्यांची एक सक्षम सेना उभी करण्यासाठी सर्वांनी झटून काम करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी येथे आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा सभेत ते बोलत होते.
येथील श्रीराम वाचन मंदिरात कृषी विभागाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यांतील कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला, तसेच गतवर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. केसरकर म्हणाले की, ‘चांदा ते बांदा’ योजनेतून आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. श्री पद्धतीने लागवड करून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘फूड सिक्युरिटी आर्मी’ योजनेतून शेतकरी आणि त्यांच्या मुलांसाठी लाभ दिला जात आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो, त्यामुळे राज्यात कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, तर त्यांना ओला चारा पुरवण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी उन्हाळी शेतीचे प्रमाण वाढवणे आणि दुबार पिकांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बियाणांची आगाऊ मागणी, पाण्याचे नियोजन आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची मदत घेणे आजच्या काळाची गरज आहे. आतापासून तयारी केली तर जून महिन्यात लागवड करणे सोपे होईल. वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करून फळ पिकांकडेही लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी कृषी विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची कानउघडणी केली. सभेत वरिष्ठ अधिकारी माहिती देत असताना काही कर्मचारी मोबाईलवर किंवा गप्पा मारण्यात व्यस्त असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही सभा नक्की कोणासाठी आयोजित केली आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली.
आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि शेती विकासाचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, दोडामार्ग पंचायत समिती उपसभापती गणेश प्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, यज्ञा साळगावकर, विजय नाईक, तालुका कृषी अधिकारी (सावंतवाडी) जी. एस. गोरे, कृषी अधिकारी (वेंगुर्ला) मंगेश चव्हाण, कृषी अधिकारी (दोडामार्ग) एस. डी. कदम, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, जितेंद्र गांवकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, शरद धाऊसकर यांच्यासह तीनही तालुक्यातील कृषी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












