पालकमंत्र्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांवर करावी कारवाई : असनिये ग्रामस्थांची मागणी

महावितरण विरोधात आंदोलन :न्याय मिळेपर्यंत दूर न हटण्याचा पवित्रा

मनीष दळवी यांच्या मध्यस्तीनंतर लेखी आश्वासनांती आंदोलन स्थगित

सावंतवाडी । प्रतिनिधी : महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळलेल्या असनिये गावातील ग्रामस्थांनी आज महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला तीव्र संताप व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी नेमावेत आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. “महावितरणला पोलीस बोलावणे कळते, मग कामासाठी कर्मचारी का नाही?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना विचारत खडे बोल सुनावले. अखेर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मध्यस्थीनंतर आणि कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

असनिये गावातील अनेक वीज समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समस्यांबाबत वारंवार महावितरणचे लक्ष वेधूनही केवळ आश्वासने दिली जात असून, नाममात्र कार्यवाहीपलीकडे कोणतीही ठोस कृती झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. महावितरणच्या या बेजबाबदार आणि कर्तव्यशून्य कारभाराविरोधातच असनियेवासीयांनी आज जोरदार आंदोलन करत आपला तीव्र रोष व्यक्त केला.

ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. “महावितरण खोटं बोलत आहे. लाईट बिल भरले नाही तर तुम्ही घरापर्यंत येता, मग आता लेखी आश्वासन देऊनही काम का करत नाही? मुख्य अभियंत्यांकडून कामाचे आदेश असतानाही काम का होत नाही? वरिष्ठ अधिकारी साहित्य, काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला सूचना दिल्याचं सांगतात, पण स्थानिक अधिकारी काम करत नाहीत,” असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी केला.

गावात विजेची तार पडून बैल दगावल्याच्या घटनेचाही ग्रामस्थांनी उल्लेख केला. “चार दिवसांपूर्वीच लाईन बदलली होती, तरीही झाड न पडता लाईन पडून बैल मेला, यावरून कामाचा घटिया दर्जा लक्षात येतो,” असे ग्रामस्थ म्हणाले.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामाची सखोल चौकशी करावी आणि सर्वप्रथम या अधिकाऱ्यांना बदलावे, त्यानंतर पोल बदलावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. “कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी असावेत. या अधिकाऱ्यांना कोकणवासीयांविषयी आस्था नाही, त्यामुळे यांना कामाला लावा, हे फक्त कार्यालयात बसून असतात,” असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले .

बैल मेल्यानंतर दिलेले आश्वासन खोटे ठरल्याचा आरोप करत, “सगळे रिपोर्ट देतो असे सांगून आजपर्यंत एकही रिपोर्ट दिला नाही. आता पोलिसांकडून रिपोर्ट घेऊन या असे अधिकारी सांगतात. चार दिवसांत काम करण्याचे आश्वासन दिले आणि आता ‘तुमचं तुम्ही बघा’ असे सांगत आहेत. माणूस मरायची वाट बघता का? यावरून अधिकारी किती खोटारडेपणा करत आहेत हे लक्षात येते,” अशा तीव्र शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

अधिकारी फोन उचलत नाहीत, हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले पाहिजे, आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.

महावितरणला पोलिसांना बोलावण्याचं कळतं. पण, दोन वर्षांपासून तारा तुटून माणसे मरत असताना काम करणं जमत नाही. त्यासाठी टीम मागवायला जमत नाही, पण पोलीस बोलावणं कळतं,” अशा शब्दांत असनिये ग्रामस्थांनी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याला चांगलेच सुनावले. “जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही हटणार नाही. लोक मरत आहेत. तुम्ही येणार आणि दुःख व्यक्त करून जाणार, तुमच्या दृष्टीने प्राणी, माणूस मेला तरी त्याची किंमत काहीही नाही. दोन वर्षांत तुम्ही पाहणी करू शकत नाही एवढं कसलं काम तुम्ही करता?” असाही संतप्त सवाल त्यांनी केला.

यावर उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी स्पष्टीकरण दिले की, साहित्य उपलब्ध होताच काम करत आहोत. लोखंडी पोलची मागणी केली असून, अतिजलद असे १०० पोल तातडीने बदलण्यासाठी मागणी केली आहे. गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, वातावरणामुळे अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार महावितरण कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना बोलावून घेत, त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी सरपंच रेश्मा सावंत, संदीप सावंत, जितेंद्र सावंत, राकेश सावंत, ओंकार सावंत, विठ्ठल ठिकार, दत्तप्रसाद पोकळे, समीर कोलते, शरद सावंत, दशरथ सावंत, सुधाकर घोघळे, भिकाजी नाईक, विजय सावंत, विद्या सावंत, विकास सावंत, अभिमन्यू सावंत, अमित सावंत, अनिल सावंत, रामचंद्र घोघळे, सोहम सावंत, श्रीधर सावंत, सुमन असणंकर, प्रसाद दामले, विलास ठिकार, लक्ष्मण सावंत, रत्नाकर सावंत, शौनक दामले, भिकाजी सावंत, ओंकार भुस्कुटे, विनायक कोळपते, गणपत सावंत, प्रवीण ठिकार, देवेंद्र सावंत, शैलेश खाडिलकर, बाळकृष्ण मेस्त्री, धोंडी सावंत, सतीश सावंत, उमेश पोकळे, सुभाष सावंत, विलास बर्वे, आनंद सावंत, दीपक पेडणेकर, ओंकार सावंत, न्हानु सावंत आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.