बांद्यात एक्साईज कडून १ कोटी रुपयांची दारू जप्त

बांदा : प्रतिनिधी
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतूकी विरोधात मोठी कारवाई केली आहे. इन्सुली तपासणी नाका पथकाने केलेल्या या कारवाईत सुमारे १ कोटी २३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयितला ताब्यात घेण्यात आले आहे.
​
​मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शुक्रवारी पहाटे ५.३० च्या सुमारास बांदा येथील खालसा पंजाबी ढाब्यासमोर ही कारवाई करण्यात आली. गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकची (सीजी ०४ पीक्यू ०३३५) तपासणी केली असता त्यात मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये लपवलेला विदेशी मद्याचा साठा आढळला.

​यात ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’चे १८० मि.ली. चे एकूण १,०८० बॉक्स (५१,८४० सीलबंद बाटल्या) आढळून आल्यात. या दारूची किंमत अंदाजे १ कोटी ३ लाख ६८ हजार रुपये आहे. तसेच दारू वाहतूकी साठी वापरलेला सुमारे २० लाख रुपये किमतीचा मालवाहू ट्रक असा एकूण १ कोटी २३ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​याप्रकरणी वाहन चालक पंकज गोविंद व्यास (वय ३३, रा. देवास, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ​ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले आणि अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. ​पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.