समाधान समारोह अंतर्गत २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान ‘विशेष लोकअदालती’चे आयोजन

रत्नागिरी:
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने ‘समाधान समारोह २०२६’ अंतर्गत येत्या २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘सहभागी न्याय’ आणि ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पांना बळ देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असून, याद्वारे देशभरातील वाद प्रकरणे मध्यस्थी आणि तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. हा उपक्रम २१ एप्रिलपासून सुरू झाला असून, ऑगस्ट महिन्यातील या विशेष लोकअदालतीद्वारे त्याचा समारोप होणार आहे.
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांचा परस्पर संमतीने आणि आपसी समन्वयातून जलद निपटारा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना आभासी व्यासपीठाद्वारे (व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म) या लोकअदालतीमध्ये सहभागी होता येईल, ज्यामुळे त्यांना घरबसल्या आपली प्रकरणे निकाली काढता येतील.
या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद त्राय. जाधव, जिल्हा न्यायाधीश-१ ए. एम. अंबाळकर आणि प्राधिकरणाचे सचिव श्री. राजेंद्र आर. पाटील यांनी केले आहे. तडजोडपात्र प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
या विशेष लोकअदालतीबाबत अधिक माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, अधिक माहितीसाठी पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ८५९१९०३६०८ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२३५२-२२४७६८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.