सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक बांधिलकीची आणि मानुसकीची भावना कायम जपत ‘सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळातर्फे’ एक अत्यंत कौतुकास्पद व मानवीय पहल समोर आली आहे. समाजातीलच एक होतकरू समाजबांधव श्री. दादू सुरेश म्हापणकर हे सध्या एका दुर्मिळ आजाराशी गंभीर लढा देत आहेत. त्यांच्यावरील या खडतर व महागड्या उपचाराचा आर्थिक भार उचलणे कुटुंबासाठी अत्यंत कठीण बनले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाने तातडीने पुढाकार घेत सर्व स्तरातून मदतीचे आवाहन केले होते.
मंडळाच्या या हाकेला साद देत जिल्ह्यातूनच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरूनही सढळहस्ते मदतीचा ओघ सुरू झाला. एकूण ८४ दात्यांनी पुढे येत सढळहस्ते आर्थिक हातभार लावला, आणि बघता-बघता ८६,०००/- रुपये (शहाऐंशी हजार रुपये) इतकी भरीव निधी रक्कम जमा झाली. संकटकाळात समाजाकडून मिळालेल्या या आर्थिकाधारे म्हापणकर कुटुंबाला मोठा मानसिक आणि भावनिक आधार मिळाला आहे.
जमा झालेली ही संपूर्ण मदत आज सावंतवाडी येथील ॲड. अनिल निरवडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अधिकृतपणे श्री. दादू म्हापणकर यांचे बंधू श्री. लवू म्हापणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
ही मदत सुपूर्द करताना सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, माजी जिल्हाध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष,ॲड. अनिल निरवडेकर,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,विवाह समिती प्रमुख रविकिशोर चव्हाण, सल्लागार पी. बी. चव्हाण,कणकवली सचिव मंगेश आरेकर,शिक्षण समिती प्रमुख प्रशांत चव्हाण,जिल्हा सदस्य
ॲड. गणेश चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी, कठीण आणि संकटसमयी धावून आलेल्या सर्व दानशूर दात्यांचे तसेच या उपक्रमाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.













