महिला क्रिकेटपटूसह तिघांना सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात अटक; ६३ लाखांची उकळपट्टी उघड

मैत्रीचे रूपांतर ब्लॅकमेलिंगमध्ये; चॅट्स व्हायरल करण्याची धमकी
मुंबई पोलिसांची कारवाई; जम्मू-काश्मीरमधून आरोपींना अटक

मुंबईत सेक्सटॉर्शन आणि खंडणीच्या गंभीर प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील महिला क्रिकेटपटूसह तिघांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून ओळख वाढवत आरोपींनी एका तरुणाला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. खासगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देत तब्बल ६३ लाख रुपयांची उकळपट्टी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत महिला क्रिकेटपटू, तिचा भाऊ आणि आणखी एका साथीदाराला अटक केली. या घटनेमुळे क्रिकेट आणि सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


मुंबई : सेक्सटॉर्शन आणि खंडणीच्या प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील महिला क्रिकेटपटू फरखांदा कसीझ खान हिला तिचा भाऊ बाझिल कसीझ खान आणि साथीदार इम्तियाज उद्दीन वानी यांच्यासह अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरखांदा खान ही राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळलेली असून ती जम्मू-काश्मीर टी-२० लीगमध्ये सहभागी झाली होती. २०२४ मध्ये कुलाबा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाची तिच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला मोबाईल चॅटिंगमधून दोघांमध्ये मैत्री वाढली. त्यानंतर त्यांच्यात खासगी आणि वैयक्तिक स्वरूपाचे संभाषण सुरू झाले.

यानंतर पीडित तरुणाची ओळख इम्तियाज उद्दीन वानी आणि बाझिल खान यांच्याशी करून देण्यात आली. काही दिवसांनी फरखांदाने आर्थिक अडचणीचे कारण सांगत संबंधित तरुणाकडे पैशांची मागणी केली. सुरुवातीला त्याने मदत म्हणून पैसे दिले. मात्र त्यानंतर आरोपींनी खासगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देत त्याच्याकडून सातत्याने पैसे उकळण्यास सुरुवात केली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२४ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत पीडित तरुणाने तब्बल ३२ बँक व्यवहारांद्वारे २३.६१ लाख रुपये फरखांदाच्या खात्यात ट्रान्सफर केले. तसेच इतर काही रक्कम आरोपींच्या संबंधित खात्यांमध्येही जमा करण्यात आली होती.

यानंतर आरोपींनी पुन्हा धमक्या देत आणखी पैशांची मागणी केली. “आमच्याकडे तुमचे खासगी चॅट्स आहेत आणि ते व्हायरल करू,” अशी धमकी देत आरोपींनी तक्रारदाराकडून आणखी ४० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडिताने जानेवारी २०२६ मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू करत फरखांदा खान, तिचा भाऊ आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.