​सावंतवाडी लोकअदालतीत ८१ लाख ६९ हजारांची वसुली; ५२ प्रकरणांत तडजोड

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशी एकूण ९१७ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी ५२ प्रकरणे सामंजस्याने आणि तोडजोडीने यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली. या प्रकरणांच्या माध्यमातून एकूण ८१ लाख ६९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

​या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली १६६ दिवाणी व फौजदारी प्रकरणे आणि ३७ ‘पिटी ऑफेन्स’ अशी एकूण २०३ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यातील ४५ प्रकरणे निकाली निघाली असून, त्यातून ६३ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम वसूल झाली आहे. तसेच, वादपूर्व स्तरावरील एकूण ७१४ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी ७ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असून त्यातून १८ लाख ३२ हजार रुपयांची वसुली झाली आहे. प्रलंबित आणि वादपूर्व अशा दोन्ही विभागांतील मिळून एकूण ५२ प्रकरणांत पक्षकारांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने न्यायालयाचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत झाली आहे.

​या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा सावंतवाडी तालुका दिवाणी न्यायाधीश सौ. जे. एम. मिस्त्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी लोकअदालत पॅनल सदस्य वकील श्रीमती एस. वाय. केसरकर, तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बी. बी. रणशूर, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह तालुका वकील बारचे अनेक नामवंत वकील आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील बँक ऑफ इंडिया (सावंतवाडी व बांदा शाखा), स्टेट बँक ऑफ इंडिया (सावंतवाडी), महाराष्ट्र ग्रामीण बँक (दाणोली), बँक ऑफ महाराष्ट्र (आरोंदा शाखा) आणि बँक ऑफ बडोदा (सावंतवाडी) यांचे विशेष योगदान व परिश्रम लाभले आहेत.

​तसेच दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सौ. आर्या अडुळकर, शुभम शिंदे, विशाल पाटील, दिवाणी न्यायालय कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक श्रीमती व्ही. एम. मीर, व्ही. ए. देसाई, सौ. मिनाक्षी नाडकर्णी, दिवाकर सावंत, सौ. कदम, श्री. तांबे, श्री. छजलाने, सौ. ओटवणेकर, कु. कोरगांवकर आणि अभय चव्हाण या सर्वांनी ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. सामंजस्याने प्रकरणे निकाली निघाल्यामुळे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे.