पंजाबमध्ये ‘आप’चे भाजपविरोधात आंदोलन; मंत्री संजीव अरोरा यांच्या अटकेनंतर राजकारण तापले

पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत विविध ठिकाणी आंदोलन केले. पक्षाच्या नेत्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. ईडीने कथित जीएसटी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरोरा यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पंजाबमध्ये ‘आप’ आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.


ईडीच्या कारवाईनंतर ‘आप’चा भाजपवर हल्लाबोल

पंजाब : आम आदमी पक्षाने (AAP) रविवारी राज्यभरात भाजपविरोधात आंदोलन करत कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी विविध शहरांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळे जाळले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात “ईडी-भाजप गाठजोड मुर्दाबाद” असे फलक पाहायला मिळाले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कथित 100 कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शनिवारी संजीव अरोरा यांच्याशी संबंधित काही संस्थांवर छापे टाकले होते. त्यानंतर त्यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. चंदीगडमधील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

केंद्र सरकारवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप

‘आप’ने ही कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, Hampton Sky Realty Limited या कंपनीने कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास असल्याचे सांगत सर्व संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. जालंधरमधील आंदोलनात सहभागी झालेले मंत्री मोहिंदर भगत यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर तीव्र टीका केली.

पंजाब सरकारच्या विकासकामांना अडथळा आणण्यासाठी केंद्र सरकार विविध डावपेच राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. संपूर्ण पक्ष संजीव अरोरा यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, होशियारपूर, लुधियाना, मोहाली आणि बर्नाला यांसह अनेक शहरांमध्येही ‘आप’कडून आंदोलन करण्यात आले. भाजप राज्यातील ‘आप’ सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे घाबरले असून त्यामुळेच विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्यांनी केला.