​वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना दोन वर्षांची मुदतवाढ द्या

नगरसेवक देव्या सुर्याजी यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत आहे. मात्र, रुग्णालयातील रिक्त पदे आणि वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. ऐवळे यांचा अनुभव पाहता, त्यांना डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या धर्तीवर दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी रुग्ण कल्याण समिती सदस्य, आमदार प्रतिनिधी तथा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केली आहे.

​याबाबत देव्या सुर्याजी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले असून, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनही पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी रुग्णालयाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.

​दीर्घ अनुभवाचा रुग्णालयाला फायदा
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे १९९६ पासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा दिली असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळला आहे. रुग्णालयाची सध्याची स्थिती आणि तेथील आव्हाने पाहता, डॉ. ऐवळे निवृत्त झाल्यास व्यवस्थापनावर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना कार्यकाळ वाढवून देणे आवश्यक असल्याचे सुर्याजी यांनी म्हटले आहे.

​डॉ. रेड्डींच्या नावाचाही प्रस्ताव
जर मुदतवाढ देणे शक्य नसेल आणि अन्य कोणाचा वैद्यकीय अधीक्षक पदासाठी विचार करायचा झाल्यास, उपजिल्हा रुग्णालयात नव्याने रुजू झालेले फिजीशियन डॉ. रेड्डी यांच्या नावाचा विचार करावा, अशी मागणीही श्री. सुर्याजी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

​रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असतानाच अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची निवृत्ती रुग्णालयासाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे आता सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.