केळणे बौद्धवाडीत गुरांच्या कारणावरून वाद चिघळला; हाणामारीनंतर ॲट्रॉसिटीसह परस्पर गुन्हे दाखल

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील केळणे बौद्धवाडी येथे गुरांनी पेंड खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेला वाद चांगलाच चिघळला असून, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूंचे काहीजण जखमी झाले असून, खेड पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एका तक्रारीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी केळणे बौद्धवाडी परिसरात गुरांनी पेंड्याच्या उडवीतील पेंढे खाल्ल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद पुढे वाढत जाऊन दोन्ही बाजूंमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की आणि काठ्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली.
विठ्ठल धोंडू खरात (वय ४५, रा. केळणे धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विकास सखाराम कदम आणि वर्षा विकास कदम यांनी गुरांनी पेंड खाल्ल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर विकास कदम यांनी हातातील काठीने विठ्ठल खरात यांच्या डोक्यात मारहाण करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, विकास सखाराम कदम (वय ५५, रा. केळणे बौद्धवाडी) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संदीप खरात, विठ्ठल खरात, सचिन वरक आणि निलेश वरक यांनी घरासमोरील पेंड्याची उडवी गुरांनी ओढल्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि काठ्यांनी मारहाण केली. या घटनेत विकास कदम यांच्यासह त्यांची मुलगी वैष्णवी कदम हिलाही मारहाणीत दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी विकास कदम यांनी आपण अनुसूचित जातीतील असल्याचे नमूद करत जातिवाचक अपमान आणि मारहाण झाल्याची तक्रार दिल्यानंतर खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३(१)(आर) आणि ३(२)(व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर केळणे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.