खेड (प्रतिनिधी) : विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात आलेले किरण संजय तायडे यांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. तायडे यांच्यावतीने अॅड. साबळे व अॅड. जयेश जाधव यांनी प्रभावी बाजू मांडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय आणि सामाजिक वादातून द्वेषभावना निर्माण झाल्याने काही व्यक्तींनी किरण तायडे यांच्या कार्यालयावर हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तायडे यांनी संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
मात्र, दबावाला बळी न पडता तायडे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार खोटी असून ती दबावातून आणि सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच विनयभंगाची तक्रार देण्यासाठी संबंधित महिलेला भाग पाडण्यात आल्याचा मुद्दाही न्यायालयात मांडण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि घटनाक्रम यांचा सखोल विचार करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने किरण तायडे यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर तायडे समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












