खेड (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडून तालुक्यातील भडगाव नक्षेवाडी येथील श्रावणी सदाशिव साळुंखे यांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून मदतीचा हात देण्यात आला.
सदाशिव साळुंखे यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली असून त्या मोलमजुरी करून दोन मुलांचा सांभाळ करत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडून एक महिन्यापुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, महेंद्र शिरगावकर आणि उत्तम कांबळे यांच्या हस्ते या वस्तूंचे वितरण करण्यात आले. सामाजिक जाणीव ठेवून गरजू कुटुंबाला दिलेल्या या मदतीबद्दल परिसरातून समाधान आणि कौतुक व्यक्त केले जात आहे.












