बेजबाबदार इमारत बांधकामामुळे परांजपे कुटुंबाचा जीव टांगणीला

नगरपरिषदेच्या दुर्लक्षाबाबत माजी प्राचार्यांनी व्यक्त केला संताप

सावंतवाडी । प्रतिनिधी : शहरातील सबनीसवाडा भागात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बेजबाबदार बांधकामामुळे माजी प्राचार्य गिरीधर परांजपे आणि त्यांच्या कुटुंबावर भीषण संकट ओढवले आहे. घराशेजारील चुकीच्या पद्धतीच्या खोदकामामुळे वहिवाटीचा रस्ता आणि पायऱ्या खचल्या असून, पावसाळ्यापूर्वी याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती परांजपे यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींकडे वारंवार दाद मागूनही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

७९ वर्षीय माजी प्राचार्य गिरीधर परांजपे हे आपल्या ज्येष्ठ भाऊ आणि वहिनीसह सबनीसवाडा येथे राहतात. त्यांच्या घराशेजारील जागेत एका परप्रांतीय ठेकेदाराकडून गेल्या एक वर्षापासून इमारत बांधकामाचे काम सुरू आहे. हे काम करताना नियमांचे उल्लंघन करून सुमारे २० फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. या चुकीच्या पद्धतीमुळे परांजपे यांच्या घराकडे जाणाऱ्या सुमारे १५ ते २० पायऱ्या कोसळल्या असून, नगरपरिषदेचा सुमारे १० फुटांचा रस्ता देखील खचला आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील विद्युत भारीत खांब देखील दिव्यासह कोसळून पडला होता. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आता वाटेतील उर्वरित सर्व पायऱ्यांवर मोठ्या भेगा पडल्या असून त्या केव्हाही कोसळून जीवितस धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत बोलताना गिरीधर परांजपे यांनी अत्यंत खेद व्यक्त केला.

ते म्हणाले की, नगरपरिषदेतील बहुतांश लोकप्रतिनिधी हे माझेच विद्यार्थी आहेत. नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष आपलेच असतानाही आज मला न्यायासाठी ही कैफियत मांडण्याची वेळ आली आहे, याचे दुःख वाटते. सध्या बांधकामासाठी पाडलेले खड्डे हे मोती तलावाच्या पाण्याच्या पातळीखाली असल्याने त्यात सतत पाणी साचलेले असते, ज्यामुळे त्यांच्या राहत्या इमारतीस धोका संभवतो. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याने, सध्या डॉक्टरांकडे जाणे किंवा दैनंदिन बाजारहाट करणे देखील अशक्य झाले आहे.

परांजपे यांनी प्रशासनाकडे प्रमुख मागणी केली आहे की, त्यांच्या पारंपारिक वाटेतील पायऱ्या आणि पूर्ण वाट नीट करून दिल्याशिवाय पुढील बांधकामास परवानगी देऊ नये. तसेच पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवणे, वीज खांब पूर्ववत करणे आणि जमिनीतील खोल खंदक बुजवून समपातळी करून देणे अत्यंत आवश्यक आहे. बांधकामासाठी लावलेले २०-२२ फूट उंचीचे पत्रे वादळी वाऱ्यात पडल्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ते ही तातडीने काढण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता, नगर रचना विभाग यावर आवश्यक कार्यवाही करत असल्याचे सांगण्यात आले. बांधकाम अभियंता तुषार सरडे यांनी माहिती दिली की, बांधकाम विभागाकडून संबंधित बिल्डरला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले आणि स्थानिक नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी या तक्रारीची दखल घेतली असून, आज अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. आता या पाहणीनंतर तरी ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.