“लेक्स डिस्कशन” या कायदेशीर व्याख्यानमालेतील नववे पुष्प
सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी वकील संघटनेमार्फत सुरू करण्यात आलेल्या “लेक्स डिस्कशन” या कायदेशीर व्याख्यानमालेतील नववे पुष्प कुडाळ येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. श्रीकृष्ण उर्फ अजित भणगे यांनी गुंफले. यात ” परिस्थितीजन्य पुरावा – सरकारी पक्ष व बचाव पक्षाने घ्यावयाची काळजी” या विषयावर त्यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात ॲड. भणगे म्हणाले की, फौजदारी कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसल्यास पोलिसांना आणि सरकारी पक्षाला ‘परिस्थितीजन्य पुराव्याचा’ (Circumstantial Evidence) आधार घ्यावा लागतो. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खरी कसोटी सरकारी अभियोक्ता आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांची असते.
परिस्थितीजन्य पुरावा सादर करताना सरकारी पक्षाला घटनेपूर्वी आरोपी आणि पीडित व्यक्तीला एकत्र पाहणारे साक्षीदार, रक्ताचे डाग, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे (FSL) निष्कर्ष, डीएनए अहवाल, जप्त केलेली हत्यारे व वाहने यांसारख्या प्रत्येक लहान गोष्टीचा बारकाईने पुरावा सादर करावा लागतो. ही एक संपूर्ण साखळी असते आणि या साखळीतील एकही कडी निखळल्यास त्याचा फायदा आरोपीला मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्ह्यांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना ॲड. भणगे यांनी सांगितले की, जर केवळ मृतदेहाचा सांगाडा किंवा कवटी उपलब्ध असेल, तर ‘डीएनए टेस्ट’ किंवा ‘सुपर इंपोझिशन ऑफ स्कल’ या तंत्रज्ञानाचा वापर करून मृताची ओळख पटवता येते. उपलब्ध छायाचित्रावरून न्यायवैज्ञानिक ती कवटी संबंधित व्यक्तीची आहे की नाही, हे सिद्ध करू शकतात.
बचाव पक्षाची भूमिका आणि खबरदारी
बचाव पक्षाच्या वकिलांनी दोषारोपपत्राचे सूक्ष्म वाचन करून सरकारी पक्ष जी साखळी तयार करत आहे, ती कशा प्रकारे तोडता येईल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सामान्यतः फौजदारी खटल्यात गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची असते, मात्र बलात्कार आणि पोक्सो (POCSO) सारख्या प्रकरणांमध्ये ‘अनुमान’ (Presumption) हे तत्व लागू होते. अशा वेळी तो तर्क खोडून काढण्याचे मोठे कर्तव्य बचाव पक्षाचे असते, असेही त्यांनी नमूद केले.
व्याख्यानाच्या सुरुवातीला सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी बाबुराव रणशूर व ॲड. दिगंबर गावकर यांनी ॲड. अजित भणगे यांचे स्वागत केले. या प्रसंगी ॲड. माधवी पेंडुरकर, ॲड. धनंजय पेंडुरकर, ॲड. स्वप्नील कोरगावकर, ॲड. अलका कासकर, ॲड. अंकुश ठाकूर, ॲड. समीर वंजारी, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. वामन निर्गुण, ॲड. अमेय खानविलकर, ॲड. हरी वरवडेकर आदी वकील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी योगिनी यशवंत विर्नोडकर हिने केले, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी केले. या व्याख्यानास सावंतवाडी विधी महाविद्यालय आणि डान्टस लॉ कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. भणगे यांनी नवोदित वकिलांशी संवाद साधत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.













