रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, ०९ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये वर्षातील दुसऱ्या ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. विनोद वाय. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली एकूण ३,८७२ प्रकरणे आणि वाद दाखलपूर्व (Pre-Litigation) एकूण १५,३४० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाला वकील आणि पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी १५२ प्रकरणे, तर वादपूर्व प्रकरणांपैकी ४,१७४ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. या यशस्वी तडजोडींमध्ये प्रामुख्याने दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश (चेक बाऊन्स) प्रकरणे, वैवाहिक वाद तसेच बँका, पतसंस्था, थकीत वीज बिल आणि टेलिफोन बिलांशी संबंधित प्रकरणांचा समावेश होता. हे लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, विधी सेवा समितीचे कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न; ४ हजारांहून अधिक प्रकरणे तडजोडीने निकाली












