“शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी परदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करा” — नारायण राणे

आंबा-काजू नुकसान भरपाई वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

 रखडलेल्या महामार्ग कामांवरही घेतली दखल

सिंधुनगरी : प्रतिनिधी 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देत शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी आधुनिक परदेशी बी-बियाणे, तंत्रज्ञान व पीकपद्धतींचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार तथा माजी मुख्यमंत्री Narayan Rane यांनी केले. जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कृषी, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आंबा-काजू नुकसान भरपाई वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या नव्या लोकनियुक्त पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आलो होतो. जास्त उत्पन्न देणारी परदेशी बी बियाणे परदेशी पीक पद्धती याचा अवलंब व्हावा अशी अपेक्षा आहे. रिक्त पदे व निधीची कमतरता याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी लक्ष वेधणार आहे. आंबा काजू नुकसान भरपाई ची आणखी रक्कम वाढवून देण्याबाबत पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार, तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात हे पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साठविलकर, प्रितेश राऊळ, जि प सदस्य सौ दीपलक्ष्मी पडते, सौ सुमेधा पताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी विभागाला संजीवनी देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हायला हवे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढावे यासाठी जास्त उत्पन्न देणारी प्रदेशातील बी बियाणे व तंत्रज्ञान या जिल्ह्यात वापरले जावे असा आपला आग्रह आहे. त्यातून शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन वाढेल, कृषीवर आधारित प्रक्रिया प्रकल्प ही या जिल्ह्यात सुरू व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत अशी आपली अपेक्षा असल्याचे यावेळी नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करावे, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शिस्त पाळावी, ग्रामीण भागाचा विकासामध्ये जिल्हा परिषदेचे योगदान मोठे असून अधिकाऱ्यानी सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींचा चांगला वापर करावा असे मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आपण केल्याचे नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

जागतिक पातळीवर इंधन कमतरता व सोने खरेदी यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था बिघडू नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जे आवाहन केले आहे ते योग्यच आहे. खासदार व काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाची अर्थव्यवस्था समजली असती तर देशातील काँग्रेसची सत्ता गेली नसती अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

 

मुंबई गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे येथे रखडलेल्या कामाबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले. याबाबत नारायण राणे यांनी कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ मोबाईल द्वारे संपर्क साधला. तातडीने हे काम पूर्ण करा, असे आदेश त्यांनी दिले.

 

पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष नगरसेवक अशा लोकप्रतिनिशी खासदार नारायण राणे यांनी एक बैठक घेत संवाद साधला. जनतेच्या विकासाबाबत व लोकप्रतिनिधींच्या कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले.