‘नमो उद्यान’ साठी मालवण नगरपरिषदकडून जागा निश्चिती

गवंडीवाडा येथील नगरपालिकेच्या जागेवर शिक्कामोर्तब 

शासनाच्या 1 कोटी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून होणार उद्यान निर्मिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात नमो उद्यान विकसित करण्यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याबाबत आज मालवण नगरपालिकेच्या विशेष सभेत मालवण शहरातील गवंडीवाडा येथील नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर नमो उद्यान निर्माण करण्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मालवण नगरपालिकेच्या या विशेष सभेत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर, ललित चव्हाण, सुदेश आचरेकर, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर आदी उपस्थित होते.

यावेळी मालवण शहरात शासन आदेशानुसार नमो उद्यान साकारण्यासाठी जागा निश्चितीचा ठराव मांडण्यात आला. राज्यातील नगरपरिषदांना “वैशिष्ट्यपूर्ण” कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. सदर योजनेंतर्गत प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायती उत्कृष्ट उद्यान विकसित करण्याकरिता रु. १ कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याकरिता तातडीने जागा निश्चित करून काम सुरु करण्याचे शासनाचे सक्त आदेश आहेत. या नमो उद्यानसाठी मालवण शहरातील सात आरक्षित जागा सूचित करण्यात आल्या. मात्र सदर जागांच्या भूसंपादनाला मोठया प्रमाणात निधी लागणार असल्याने तसेच सदर प्रक्रियेस विलंब होणार असल्याने नगरपालिकेच्या मालकीची व ताब्यात असलेली गवंडीवाडा येथील जागा निश्चित करून तेथे उद्यानाचे काम तात्काळ सुरु करणे शक्य आहे असे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी सभागृहासमोर मांडले.

यावर सभागृहात चर्चा झाली. नगरसेविका शर्वरी पाटकर यांनी ठरावाला सूचक म्हणून भुमिका मांडली. तर प्रभागातील नगरसेवक मंदार ओरसकर यांनी गवंडीवाडा येथे नमो उद्यान होत असेल तर आनंद आहे. मात्र सदर जागेच्या आजूबाजूला व्हाळी असून कचराही टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने व्हाळीतील सांडपाणी बंद करावे तसेच कचरा टाकण्यास बंदी करावी, असे सांगत ठरावाला अनुमोदन दिले. सदर जागेबाबत अन्य नगरसेवक यांनीही सकारात्मक चर्चा करून नमो उद्यानासाठी गवंडीवाडा येथील जागेला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.