अमरावतीतील कथित लैंगिक शोषण प्रकरणात नवे दावे; ड्रग्स रॅकेट आणि व्हिडिओ विक्रीचा आरोप

अमरावतीच्या परतवाडा परिसरातील कथित लैंगिक शोषण प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. भाजप नेते अनिल बोंडे यांनी या प्रकरणात ड्रग्स रॅकेट आणि अश्लील व्हिडिओ विक्रीसारखे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. काही पोलिस अधिकाऱ्यांवरही दिरंगाई आणि तडजोडीचे आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली असून पुढे काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


एसआयटीमार्फत सखोल तपासाला सुरुवात

अमरावती : परतवाडा परिसरातील कथित लैंगिक शोषण प्रकरणात आता रोज नवे दावे आणि आरोप समोर येत आहेत. भाजप नेते अनिल बोंडे यांनी या प्रकरणात ड्रग्स रॅकेट आणि अश्लील व्हिडिओ विक्री होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून त्यामध्ये ११ पोलिस अधिकारी, ६ अंमलदार आणि ३ विशेष अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरीक्षक यांची भेट घेतली. एका पीडित मुलीच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही पोलिस अधिकारी आणि संबंधित व्यक्तींनी प्रकरणात कॉम्प्रमाईज करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला. या सर्व विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन आणि संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कोचिंग क्लासेसमधून रॅकेट चालत असल्याचा आरोप

अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणात अनेक धक्कादायक दावे केले. परतवाडा आणि अमरावती परिसरातील काही कोचिंग क्लासेस या प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संपर्कात आणून त्यांच्यामार्फत ड्रग्स पुरवठा आणि अश्लील व्हिडिओंची विक्री केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात काही मोठ्या लोकांचाही सहभाग असल्याचे त्यांनी सूचित केले.

बोंडे यांनी असेही सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयाज याला काही वर्षांपूर्वीच राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्यावेळी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली नाही. आता त्याच्या घरावर बुलडोझर कारवाई झाल्यानंतर नागरिकांमध्ये समाधानाची भावना असल्याचेही त्यांनी म्हटले. या प्रकरणाचा तपास अधिक खोलात जाऊन होणार असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.