श्रेया योगेश कदम यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण; क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांचा लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरव
खेड (प्रतिनिधी) : जलालशाह क्रिकेट क्लब आयोजित JCC ट्रॉफी २०२६ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. अंतिम सामन्यात फोपलोन क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबवर मात करत विजेतेपद पटकावले आणि JCC ट्रॉफीवर आपले नाव कोरले. खेडमधील क्रिकेटप्रेमींसाठी रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली.
फोपलोन क्रिकेट क्लब आणि नॅशनल क्रिकेट क्लब यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. फोपलोन क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करत १४२ धावांची दमदार मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना नॅशनल क्रिकेट क्लबला १०५ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे फोपलोन क्रिकेट क्लबने अंतिम सामन्यात विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर नॅशनल क्रिकेट क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला आमदार तथा गृह राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या फोपलोन क्रिकेट क्लबला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. खेड नगराध्यक्षा माधवी ताई बुटाला आणि खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. आफिया पालेकर यांच्या हस्ते उपविजेत्या नॅशनल क्रिकेट क्लबला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत वैयक्तिक पुरस्कारांमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मान रिकी जॉय याने पटकावला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अहमद हमदुले याचा गौरव करण्यात आला, तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दीप याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रिकेट क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींचा लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये जलालशाह पुरस्कारप्राप्त तसेच २०११ ते २०१३ या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये क्रिकेट खेळलेले बख्तियार पालेकर, आमशाद क्रिकेट क्लबचे अखलाक परकार, मुस्लिम स्पोर्ट्सचे गौस खतीब, राजवेल क्रिकेटचे निसार हमदुले आणि सवणस क्रिकेटचे सुर्वे यांचा गौरव करण्यात आला. क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत आयोजकांनी त्यांना सन्मानित केले.
या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन आणि सामने सुरळीत पार पाडण्यासाठी पंच म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राकेश मोरे सर यांचेही आयोजकांनी विशेष आभार मानले. त्यांच्या निष्पक्ष पंचगिरीमुळे स्पर्धेतील सामने शिस्तबद्ध आणि खेळभावनेने पार पडले.
या समारोप सोहळ्याला माजी सभापती सिकंदरभाई जसनाईक, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ग्यासुद्दीन नाडकर, शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, खेडचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, शिवसेना नगरसेवक तथा गटनेते निकेतन पाटणे, प्रेमल चिखले, तोसिफ खोत, यश खेडेकर, माजी सभापती सुप्रिया पवार, अल्पसंख्याक महिला संघटक सबा दलवी, अल्पसंख्याक महिला शहरप्रमुख रोजी देसाई, शादाब फोपलोनकर, सिद्धीक जुबैर कावळेकर, इसाक अब्दुर्रहमान सिद्धीकी, रिझवान सिद्धीकी, जुबेर कावळेकर, भाजप नगरसेवक रहीम साहिबोले, एस.के. असोसिएशनचे मालक शमशुद्दीन खान, अल्पसंख्याक युवा जिल्हाप्रमुख साहिल खान, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख लायक महाडिक आणि जलालशाह मुल्ला यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी, युवा कार्यकर्ते आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलालशाह क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे खेडमधील स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळते, स्थानिक क्रिकेटला चालना मिळते आणि युवकांमध्ये क्रीडाभावना, संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रायोजक, क्रिकेटप्रेमी, खेळाडू, पंच, आयोजक आणि उपस्थितांचे अल्पसंख्याक शहरप्रमुख सरफराज पांगारकर यांनी मनःपूर्वक आभार मानले. JCC ट्रॉफी २०२६ च्या दिमाखदार समारोपामुळे खेडच्या क्रिकेट क्षेत्रात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.













