मिशन खाकी’ला मोठे यश; पोलीस भरतीच्या तयारीसाठी राज्यातील मैदाने आता विनामूल्य उपलब्ध

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मैदानांवर सरावासाठी मिळणार परवानगी

खेड (प्रतिनिधी) : राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने व क्रीडांगणे पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गृह (शहरे) राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
राज्यातील तरुणांना पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या मेहनतीला योग्य संधी मिळावी आणि भरती प्रक्रियेची तयारी करताना मैदानांच्या अभावामुळे अडचणी निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने ‘मिशन खाकी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यभरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या.
या संवादातून सरावासाठी योग्य मैदान उपलब्ध नसणे ही तरुणांसमोरील सर्वात मोठी समस्या असल्याचे समोर आले होते. अनेक युवकांना मैदानी चाचणीची तयारी करण्यासाठी खासगी मैदानांचा आधार घ्यावा लागत होता, तर काही ठिकाणी मैदान उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या सरावावर मर्यादा येत होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी योगेश कदम यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीची मैदाने पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
योगेश कदम यांच्या मागणीची दखल घेत नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने, क्रीडांगणे तसेच संबंधित संस्थांच्या अंतर्गत व्यवस्थापनाखाली असलेली मैदाने पोलीस भरतीच्या उमेदवारांना विनामूल्य सरावासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित पदांच्या मैदानी चाचण्या पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना सरावासाठी मैदानांचा वापर करता येणार आहे. यासाठी सकाळी ५ ते ९ या वेळेत किंवा सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत सराव करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना नियमित धावण्याचा सराव, शारीरिक क्षमता वाढविणे आणि मैदानी चाचणीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेणे अधिक सुलभ होणार आहे.
केवळ मैदान उपलब्ध करून देण्यापुरताच हा निर्णय मर्यादित नसून, उमेदवारांना सरावासाठी स्वच्छ आणि सुरक्षित मैदान, क्रीडांगण तसेच धावपट्टी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सरावासाठी येणाऱ्या युवकांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये आणि आवश्यक प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली आहे.
याशिवाय सरावादरम्यान एखाद्या उमेदवाराला दुखापत झाल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुविधांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे तसेच मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे सहकार्य घेण्याचेही नगरविकास विभागाने सूचित केले आहे.
‘मिशन खाकी’अंतर्गत करण्यात आलेल्या या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो युवकांना मोठा फायदा होणार आहे. मैदानांसाठी होणारा खर्च कमी होऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनाही समान संधी मिळणार आहे. पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना आता सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
नगरविकास विभागाच्या या निर्णयाचे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी स्वागत केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘मिशन खाकी’च्या माध्यमातून तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या स्वप्नांना बळ देणारा हा निर्णय राज्यातील पोलीस भरतीच्या इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.