गोरगरीब विक्रेत्यांच्या कारवाईवरून शिवसेना नगरसेवक आक्रमक
सावंतवाडी | प्रतिनिधी : शहरातील ३० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भाजी विक्रेत्यांवर नगरपरिषदेने सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी आहेत, त्या आधी हटवा आणि मगच हातावर पोट असणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई करायला या, असा थेट इशारा नगरसेवकांनी न.प. प्रशासनाला दिला. याप्रश्नी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
सावंतवाडी नगरपरिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील आणि अनधिकृत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. मात्र, ३०-३० वर्षे पालिकेची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांनाही हटवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर आणि ॲड. सायली दुभाषी यांनी विक्रेत्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरून प्रशासनाला धारेवर धरले.
नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल
नगरसेवक देव्या सुर्याजी म्हणाले की, “हे विक्रेते वर्षभर पालिकेची रीतसर पावती भरून व्यवसाय करतात. मग आता अचानक त्यांना जप्तीची धमकी देऊन त्यांचा रोजगार का हिरावला जात आहे? शहरातील इतर अनधिकृत गोष्टी प्रशासनाला दिसत नाहीत का? आम्ही त्या दाखवून देतो, आधी त्या हटवून दाखवा ,असा पवित्रा घेतला.
नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी प्रशासकीय दुटप्पीपणावर बोट ठेवले. जर हे विक्रेते अनधिकृत आहेत, तर अधिकारी कोणत्या आधारावर त्यांच्याकडून गेली अनेक वर्षे पावत्या फाडत आहेत? निवडणुका वेळी मत मागताना स्थानिकांकडे जाता आणि आता त्यांनाच रस्त्यावर आणता, असा सवाल त्यांनी केला. तर, ॲड. सायली दुभाषी यांनी हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांचे जगणे कठीण करू नका” अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
या वादाचे पडसाद नगरपरिषदेतही उमटले. नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, प्रथमेश प्रभू आणि संकल्प धारगळकर यांनी थेट प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे दालन गाठून त्यांना घेराव घातला. सर्व अनधिकृत कामांची यादी देतो, आधी तिथे बुलडोझर चालवा, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
कारवाई नियम सर्वांना सारखा – नगराध्यक्षा श्रध्दा भोंसले
या सर्व वादावर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ही कारवाई नियम सर्वांना सारखा या तत्त्वाने सुरू आहे. मच्छी मार्केटची जागा भाजी विक्रीसाठी आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. भाजी मंडईचे काम पूर्ण झाल्यावर या सर्व विक्रेत्यांना तिथे हक्काची आणि चांगली जागा दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ही कारवाई स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसारच सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
विक्रेत्यांची व्यथा
एका स्थानिक भाजी विक्रेत्याने आपली कैफियत मांडताना सांगितले की, “३० वर्षांपासून इथे व्यवसाय करतोय. आता अचानक हटवल्यास मुलाबाळांचे पोट कसे भरायचे? कारवाईच्या भीतीने शेजारी बसणारी वृद्ध महिला आजारी पडली आहे, असही तिने स्पष्ट केले












