▪️ग्रामदेवता चालली भक्तभेटीला!
▪️पालखी सोहळ्यास सुरुवात

अमित खोत | मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण देवता यांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यास बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडवा निमित्त आज १० नोव्हेंबर रोजी दुपारी भक्तिमय वातावरणात सुरवात झाली आहे.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण वार्षिक पालखी सोहळा निमित्त श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देवी सातेरी देवतांना सांगणे करून ढोल-ताशांच्या पारंपरिक गजरात देवतांची पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी निघाली.
आडवणमार्गे तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर येथे थांबून समुद्रमार्गे देव मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबते. त्यानंतर देव दांडेश्वर मंदिर येथून श्री देवी काळबादेवी मंदिर येथे थांबते. देव रामेश्वर, देव नारायण आणि बहीण श्री काळबादेवीचा पारंपरिक भाऊबीज सोहळा मोठ्या थाटात साजरा होतो. त्यानंतर पालखी जोशी मांड येथे येईल व त्यानंतर नगर वाचनालय कडून सोमवार पेठेतील श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे थांबेते. यावेळी व्यापारी, भविकांची मोठी गर्दी होते. त्यानंतर पालखी बाजारपेठ भरडमार्गे देऊळवाडा येथे मंदिरात येते.
पालखी सोहळ्यामुळे मालवण नगरीला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत. पालखी मार्गांवर सर्व ठिकाणी तसेच समुद्र किनाऱ्यावर भाविकांची मोठी गर्दी असते. मच्छीमार, व्यापारी, भाविक सर्वांकडून मोठया उत्साहात देवतांच्या पालखीचे स्वागत करण्यात येते.
देवस्थान ट्रस्टतर्फे सोहळा उत्साहात होण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येते. तर भाविक, ग्रामस्थ, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, व्यापारी संघ, स्थानिक प्रशासन आणि समस्त मालवणकर हा सोहळा मोठ्या उत्साहात होण्यासाठी प्रयत्नशिल राहून सहभागी होतात. भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे,असे आवाहन श्री देव रामेश्वर, देव नारायण, देवी सातेरी, देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
▪️सर्व छायाचित्र : गणेश गांवकर, मालवण













