रत्नागिरी जिल्ह्यात १७ मे पर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज; खरीप पूर्वतयारीसह फळबागांची काळजी घेण्याचे आवाहन

रत्नागिरी: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १३ ते १७ मे २०२६ या कालावधीत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून, हवेतील आर्द्रता ७३ ते ८२ टक्क्यांपर्यंत राहील. विशेषतः १४ आणि १७ मे रोजी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ERFS), कोकण विभागात १७ ते २३ मे दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या काळात तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जारी केला आहे.
आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच जमिनीची खोल नांगरट करून जमीन १५-२० दिवस उन्हात तापू द्यावी, ज्यामुळे किडींच्या सुप्त अवस्थांचा नाश होईल. भात शेतीसाठी बांधांची दुरुस्ती आणि दर्जेदार बियाणे, खते व कीडनाशकांची वेळेत उपलब्धता करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भात रोपवाटिकेसाठी गादीवाफे तयार करताना प्रति गुंठा १०० किलो शेणखत वापरावे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, कर्जत-३ (हळव्या जाती), रत्नागिरी-२४, कर्जत-७ (निमगरव्या जाती) आणि रत्नागिरी-८, ६ यांसारख्या विविध सुधारित भात जातींची शिफारस केली असून, हे बियाणे शिरगाव, वाकवली आणि कर्जत येथील संशोधन केंद्रांवर उपलब्ध आहे.
फळबागांच्या बाबतीत, हापूस आंब्याची काढणी ८० ते ८५ टक्के पक्वतेवर सकाळी १० वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर ‘नूतन’ झेल्याच्या साह्याने करावी, जेणेकरून फळांमधील ‘साका’ होण्याचे प्रमाण कमी राहील. काढणी पश्चात फळकूज रोगाच्या नियंत्रणासाठी फळे ४०°C उष्ण जलात पोटॅशियम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवावीत. नवीन आंबा, काजू, नारळ व सुपारी लागवडीसाठी खड्डे खणून ते शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवी नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस भुकटीच्या मिश्रणाने भरून घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
पशुपालकांनी वाढत्या उष्णतेपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी त्यांना दुपारच्या वेळी चरण्यास बाहेर सोडू नये आणि स्वच्छ, थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी. शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी गुळ व मिठाचे द्रावण चाऱ्यावर शिंपडावे आणि गोठ्यात फॉगर्सचा वापर करावा. तसेच, जनावरांना ‘पायलाग’ रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हळद लागवडीसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिना हा काळ योग्य असून, लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनोलफॉस आणि कार्बेन्डॅझिमची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. माती परीक्षणासाठी देखील हा काळ योग्य असून शेतकऱ्यांनी तीन ते चार वर्षातून एकदा माती परीक्षण करून घ्यावे.