विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी | प्रतिनिधी :आंबडपाल गावची ग्रामदेवता स्वयंभू श्री देवी भद्रकाली मंदिराचा २६ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री देवी चरणी एकादशी, अभिषेक व गणेश पूजनाने होणार असून सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सार्वजनिक ग्रामस्थांचे अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ वाजता हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी ६.३० वाजता आरती होणार आहे. तर सायंकाळी ७.३० वाजता गोव्यातील सुप्रसिद्ध गायक शुभम नाईक व नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत भजन स्वर संध्या रंगणार आहे. या कार्यक्रमात गायक रोहित गावस, गायक गितेश इंफाळकर , हार्मोनियम वादक अमोल गावस तसेच पखवाज वादक प्रतीक देसाई सहभागी होणार आहेत.
रात्री १०.३० वाजता मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोरे यांचा “माया अवतरी भुवनी, रक्षण करिता भक्तांचे” हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या निमित्ताने सर्व भाविकांनी दर्शन, महाप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.













