आंबोली । प्रतिनिधी :सावंतवाडी तालुक्यातील चौंकुळ येथे रविवारी १० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये चौंकुळ, गेळे आणि आंबोली येथील एकूण २६५ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
हे शिबिर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (धारगळ, गोवा), श्री राम युवा कला क्रीडा मंडळ (आंबोली) आणि फ्रेंड्स सर्कल युवा मंडळ (चौंकुळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. चौंकुळ हायस्कूल जवळ झालेल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, स्त्रीरोग आणि बालरोग यांसारख्या विविध आजारांची सखोल तपासणी केली.
शिबिराच्या नियोजनासाठी दिनेश गावडे, मायकल डिसोझा आणि विजय गवस यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य शिबिरामध्ये मिळालेली वागणूक आणि व्यवस्थित तपासणी यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रसंगी आयोजकांसह अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.













