जनतेचे सर्व प्रश्न व समस्या मार्गी लावण्याची आ. किरण सामंत यांची ग्वाही
जनता दरबारात नागरिकांच्या ६५ तक्रारी दाखल
प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे आदेश
राजापूर (वार्ताहर): : आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच जनता दरबाराला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी विविध वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मांडण्यात आलेल्या प्रश्नांची तात्काळ दखल घेत संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करून येत्या पंधरा दिवसांत या कार्यवाहिचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, तहसीलदार विकास गंबरे, सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नगर परिषद मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील प्रश्नांवर तातडीची दखल
शहरातील नागरिक अजिम जैतापकर यांनी महामार्गावरील स्पीडब्रेकरमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात आणून देत त्या ठिकाणी सूचना फलक उभारण्याची मागणी केली. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय आठवड्याचे सर्व दिवस सुरू ठेवावे आणि भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचारीवाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
दिवटेवाडी येथील श्री. दुदम यांनी सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. यावर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दोन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच शहरातील पाणी योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला देण्यात आल्या. हा प्रश्न विनायक सावंत यांनी उपस्थित केला होता.
ग्रामीण भागातील समस्यांवरही चर्चा
ससाळे येथील प्रशासक श्रीमती तांबे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या जागेचा प्रश्न मांडला. वडवली येथील बाळकृष्ण सरफरे यांनी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. खरवते गावातील गणपत चौगुले यांनी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मांडला, तर धाऊलवल्ली येथील रूपेंद्र कोठारकर यांनी बेकायदा वाळू उपशाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
बारसू येथील विनायक कदम यांनी गावातील लोखंडी साकव दुरुस्त करण्याची मागणी केली. याशिवाय तालुक्यातील आरोग्य सेवा, वीज समस्या, बेरोजगारी, बेकायदा दारू विक्री तसेच महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्नही त्यांनी मांडले. या सर्व विषयांवर आमदार किरण सामंत यांनी सविस्तर भूमिका मांडली.
सातबारा दुरुस्ती व वारस नोंदींचे प्रश्न
हसोळ येथील संजय कुळये यांनी वारस नोंदीसाठी होत असलेल्या विलंबाबाबत तक्रार केली. तर संदीप तावडे यांनी कलम १५५ अंतर्गत सातबारा दुरुस्तीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर प्रत्येक भागात विशेष शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्तीचे प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या.
विविध मागण्या प्रशासनासमोर
सुनिल पवार यांनी बीएसएनएलकडून त्यांच्या जमिनीत उभारण्यात आलेल्या टॉवरचा प्रश्न उपस्थित केला. तर उल्हास खडपे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याशिवाय तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्ते, वीज पोल आणि इतर मूलभूत सुविधांबाबत प्रश्न मांडले.
“सर्व प्रश्न मार्गी लावणार”- आ. किरण सामंत
जनता दरबारात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडवून आणत सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. प्रलंबित भूसंपादन प्रकरणांवर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
तसेच शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून नदीपात्रातील गाळ काढण्याची मोहीमही हाती घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्पष्ट केले. या जनता दरबारात एकूण ६५ निवेदने सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले.













