सावंतवाडी:
कलंबिस्त-घनशेळवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील रहिवासी प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री (वय ७२) हे आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. ते घरात एकटेच राहत असताना ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश मेस्त्री हे आपल्या घरात एकटेच वास्तव्यास होते, तर त्यांची मुले कामानिमित्त गोवा आणि मुंबई या ठिकाणी राहतात. मंगळवार, १२ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत मेस्त्री यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांनी त्यांना अनेकदा हाक मारली, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
बराच वेळ होऊनही दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थांना बोलावले. सर्वांनी मिळून घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. यावेळी प्रकाश मेस्त्री हे बेडवर मृतावस्थेत मिळून आले.
या घटनेची खबर शत्रुघ्न बाबाजी मिस्त्री यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मेस्त्री यांच्या निधनामुळे कलंबिस्त परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.












