पशुपालनासारख्या व्यवसायाकडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज- सौ. पूजा निकम

पशुधन विविध योजना मार्गदर्शन व औषध वाटप कार्यक्रम उत्साहात
चिपळूण (प्रतिनिधी) – बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता पशुपालनासारख्या व्यवसायाकडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. जिल्हा परिषद व शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम यांनी दिली. सावर्डे येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम यांच्या माध्यमातून पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेला ‘पशुधन विविध योजना मार्गदर्शन व पशुधन औषध वाटप’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने पशुपालक व शेतकरी उपस्थित होते. पशुपालकांना शासनाच्या व जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पशुधन योजनांची माहिती मिळावी तसेच गाई, म्हशी व इतर जनावरांची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित प्रमुख शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. पूजा निकम पुढे म्हणाल्या की, पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण व औषधोपचार किती महत्त्वाचे आहेत, याबाबतही त्यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले. “आज वितरित करण्यात आलेल्या औषधांचा योग्य वापर करून पशुपालकांनी आपल्या जनावरांचे आरोग्य जपावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी व सहाय्यक डॉक्टरांनी पशुधनाचे आरोग्य, साथीच्या आजारांपासून बचाव, लसीकरणाचे महत्त्व तसेच योग्य पशुखाद्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर सौ. पूजा निकम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पशुपालकांना विविध पशुधन औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, सावर्डे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळू मोहिरे, प्रगतशील शेतकरी बंधू महाडिक, शरद भुवड, दिनेश शिंदे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डाकोरे, डॉ. यादव, डॉ. भोईर, डॉ. बेलवडे तसेच परिसरातील अनेक शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.