चिपळूण (प्रतिनिधी) : येथील डीबीजे कॉलेजमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे दि. २३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मल्लखांब खेळाचे आधारस्तंभ व शिवछत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी न. ए.सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे उपस्थित होते.
या स्पर्धा दि. १९ व २० ऑगस्ट रोजी यु. ई. स्कूल चिपळूण येथे प्रस्तावित होत्या. अतिवृष्टी व पुराच्या कारणास्तव त्यापुढे ढकलण्यात आल्या. १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली अशा एकूण सहा गटामध्ये दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा गणपतीच्या सुट्टीच्या अगोदरच्या एका दिवसात पूर्ण करण्याची क्षमता डीबीजे कॉलेजच्या जिमखाना हॉलला असल्याने स्पर्धांचे आयोजन येथे करून यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक उल्हास मोहिते यांनी तर नियोजन क्रीडा शिक्षक जीवनराज कांबळे व राम कदम यांनी केले. सोबत विशाल मोहिते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तालुक्यातून आलेल्या शाळांचे संघातील विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, पालक व प्रेक्षक यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. स्पर्धेत जिंकलेल्या सर्व शाळांची /संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या सर्वांचे डीबीजे कॉलेजकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.











