घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत शईजान शेख प्रथम

खेड (प्रतिनिधी) : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ग्रंथालय विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी आणि सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेसाठी “वाचन सर्जनशीलता आणि ज्ञानाची गुरुकिल्ली” तसेच “वाचनाच्या माध्यमातून भविष्याला आकार देणे” हे दोन विषय देण्यात आले होते. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून एक हजार शब्दांपर्यंत हस्तलिखित निबंध लिहून त्याची पीडीएफ प्रत किंवा मूळ प्रत आयोजकांकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील 11 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 82 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्राप्त निबंधांचे परीक्षण करून उत्कृष्ट निबंधांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत शईजान दस्तगिर शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ते कालुस्ते हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थी असून त्यांना रोख 1500 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. तर पौर्णिमा चंद्रकांत केतकर या फुरूस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना रोख 1000 रुपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य सचिन पाटील, रजिस्ट्रार संदीप मुंनघाटे, ग्रंथालय समितीचे चेअरमन घारे सर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.