नारंगी फाट्यावर गोवंश वाहतुकीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील नारंगी फाटा परिसरात गोवंश वाहतुकीच्या संशयावरून एका ३७ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना १३ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद प्रकाश बर्गे (वय ३७, रा. हनुमान नगर, खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना गोवंश वाहतुकीबाबत माहिती मिळाल्याने ते आपल्या सहकाऱ्यांसह शोध घेण्यासाठी बाहेर पडले होते. पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास नारंगी फाटा परिसरात आरोपी सूरज सुनील जाधव (वय २५) हा दुचाकीवरून येताना दिसला. यावेळी फिर्यादी यांनी त्याला थांबवून जनावरांची अवैध वाहतूक करत आहेस का, अशी विचारणा केली.
या विचारण्याचा राग मनात धरून आरोपी सूरज जाधव याने फिर्यादींसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दुसरा आरोपी रुतिक सुनील जाधव (वय २६, दोघेही रा. चिंचघर प्रभुवाडी, ता. खेड) हा तेथे आला. त्याने रस्त्याच्या बाजूला पडलेल्या लोखंडी पाइपने फिर्यादी प्रसाद बर्गे यांच्या कंबरेवर वार करत मारहाण केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणी दरम्यान आरोपींनी फिर्यादींना पुलावरून ढकलून दिल्याने त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच फिर्यादींसोबत असलेले सहकारी प्रवीण कदम यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम 115(2), 118(1), 351(3) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.