खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील बोरज-आग्रेवाडी येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुध आणण्यासाठी घराबाहेर पडलेले व्यक्ती स्वतःच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव अरविंद रामचंद्र चिनकटे (वय ४५, रा. बोरज-आग्रेवाडी, सध्या रा. शनिनगर-पुणे) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ११ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान अरविंद चिनकटे हे आपल्या चारचाकी गाडीने (MH-12-VT-0286) “दूध आणायला जातो” असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
शोध घेत असताना बोरज येथील देऊळमाळ परिसरात त्यांची कार उभी असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता अरविंद चिनकटे हे चालक सीटवर डॅशबोर्डवर डोके ठेवून बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. त्यांना तातडीने वाहनाबाहेर काढून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल आढळून आली नाही.
घटनेची माहिती पोलीस पाटलांमार्फत खेड पोलीस ठाणे येथे देण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री ७.२० वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.













