मुंबईतील गोरेगाव परिसरातील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका डीजे कॉन्सर्टनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान कथितरित्या ड्रग्सची विक्री झाल्याचा आरोप समोर आला असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर काही युवक-युवती बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणी आयोजक, व्यवस्थापक आणि कथित ड्रग विक्रेत्यांसह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कॉन्सर्टनंतर तरुण-तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळले
मुंबई : गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 999999999 लाईव्ह डीजे कॉन्सर्टदरम्यान कथितरित्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमासाठी हजारो तरुण-तरुणींनी तिकीट खरेदी केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर काही युवक-युवती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एका तरुणासह एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात वनराई पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कार्यक्रम आयोजक, नेस्को सेंटरमधील व्यवस्थापक तसेच कथित ड्रग विक्रेत्यांचा समावेश आहे. आरोपींवर मनुष्यवध, लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि दारूबंदी कायदा यांसारख्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परवानगीपेक्षा जास्त वेळ कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विहान उर्फ आकाश (आयोजक), सनी जैन (व्यवस्थापन, नेस्को सेंटर), बालकृष्ण कुरुप (मुख्य सुरक्षा व्यवस्थापक), तसेच रौनक खंडेलवाल, आनंद पटेल आणि प्रतीक पांडे या कथित ड्रग विक्रेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य सप्लायर मानल्या जाणाऱ्या आनंद पटेल याला कल्याणमधील मोहन हायट्स येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतर काही वेळाने त्याने दरवाजा उघडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी काही प्रमाणात परवानगी घेण्यात आली होती. मात्र कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ कॉन्सर्ट सुरू असल्याचा आरोप आहे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत सुरू होते. कार्यक्रम संपल्यानंतर काही तरुणांनी स्पीकर आणि बॅरिकेटवर चढून गोंधळ घातल्याची माहितीही समोर आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणापासून अगदी जवळ पोलिस स्टेशन असूनही प्रकार घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वनराई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.











