राजापूर (वार्ताहर): रेल्वे स्थानकांच्या विकासातून कोकणच्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.केंद्र शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, व संगमेश्वर यांसह कोकणातील १२ रेल्वे स्टेशन येथील रस्ता कॉंक्रीटीकरण, रेल्वे स्टेशन परिसर विकास व सुधारणा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उदयोगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, गृहराज्य मंत्री अतुल सावे तसेच रेल्वे प्रशासन व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थीत होते.
राजापूर रेल्वेस्थानक येथे आयोजित या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण प्रसंगी भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू, यशवंत वाकडे, सौ. डबरे,अनिल करंगुटकर, सौरभ खडपे, संजय यादव, अरविंद लांजेकर, भरत लाड, नाना कोरगावकर, लांजा भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, वसंत घडशी, दिलीप तांबे, विक्रांत चव्हाण, शशिकांत प्रभुदेसाई, अनुजा पवार, शितल पटेल, शितल गोठणकर, चंद्रकांत लिंगायत, रविकांत हर्याण, केळवली सरपंच सौ. चव्हाण, हसोळ सरपंच श्री. लाड, शिवसेना केळवली विभागप्रमुख बाळकृष्ण तानवडे आदी उपस्थित होते. या ठिकाणी श्री. जठार यांच्या हस्ते या कामाच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर यांनी केले. राजापूर रेल्वे स्थानकाच्या परिसर विकास व सुधारणा तसेच रस्ता काँक्रीटीकरण कामांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन कोटी रूपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.
त्यातून या स्थानकाचा कायापालट केला जाणार आहे. राजापूर बरोबरच कोकणातील 12 रेल्वे स्थानकांचा विकास प्राथमिक टप्यात केला जाणार असल्याची माहिती नागरेकर यांनी दिली. तर या कामी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधीत केले. फडणवीस यांनी येत्या काळात कोकणातील प्रकल्पांना चालना मिळेल. असे सांगताना कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. इथली आर्थिक चणचण दुर करण्यसाठी कोकणी जनतेने येणाऱ्या प्रकल्यांचे स्वागत केले पाहिजे असे सांगितले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून भविष्यात कोकणात रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न् केले जाणार असल्याचे सांगितले.











