पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत कुडासे येथे वेफर्स फॅक्टरीचा शुभारंभ

दोडामार्ग l सुहास देसाई :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY 2.0) अंतर्गत क्लस्टर ३ मधील गावांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेचा भाग असलेल्या ‘पंचतरिका फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या वेफर्स फॅक्टरीचे उद्घाटन कुडासे येथे उत्साहात पार पडले. शासनामार्फत अनुदानित असलेल्या या कंपनीने कृषी प्रक्रिया उद्योगात पाऊल टाकत ‘वेफर्स मेकिंग’ युनिट सुरू केले आहे.

दिमाखदार उद्घाटन सोहळा

या फॅक्टरीचे उद्घाटन दोडामार्ग पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पार्वती गवस यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

PMKSY 2.0 च्या क्लस्टर ३ मध्ये परमे, कुडासे, कुंब्रल, पणतुरली आणि घोटगे या पाच गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने या शेतकरी उत्पादक कंपनीने वेफर्स उद्योगाची निवड केली आहे.

 

या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री. प्रकाश घाटगे, कृषी पर्यवेक्षक प्रसाद खडपकर, तसेच पंचतरिका कंपनीचे चेअरमन तथा परमे-पणतुरलीचे सरपंच श्री. प्रथमेश मणेरीकर आणि सचिव श्री. सुनील देसाई उपस्थित होते.

याशिवाय घोटगे सरपंच भक्ती दळवी, कुडासे प्रशासक सरपंच नम्रता देसाई, संचालक विजय दळवी, सतीश दळवी, विष्णू सुतार आणि भरत दळवी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. या नवीन उद्योगामुळे परिसरातील बटाटा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.