मळगाव घाटीतील धोकादायक रेलिंग व कठड्यांचा प्रश्न ऐरणीवर

बांधकाम विभागाला आठ दिवसांचा अल्टीमेटम अन्यथा आंदोलन 

पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे निवेदन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी-रेडी या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील मळगाव घाटीत सध्या अपघातांचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, येथील तुटलेले संरक्षक कठडे आणि निकामी झालेली लोखंडी रेलिंग प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. अलीकडेच या ठिकाणी दोन गाड्या दरीत कोसळल्या. त्यामुळे

सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन या मार्गावर मजबूत लोखंडी रेलिंग बसवावे, अशी आग्रही मागणी पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. जर येत्या आठ दिवसांत यावर ठोस कार्यवाही झाली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मळगाव, वेत्ये आणि माजगाव परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

सावंतवाडी-रेडी हा मार्ग पर्यटनाच्या आणि व्यापारी दृष्टीने अत्यंत वर्दळीचा रस्ता मानला जातो. मात्र, मळगाव घाटीतील संरक्षक भिंती अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाल्या आहेत, तर काही ठिकाणी लोखंडी रेलिंग पूर्णपणे वाकलेली किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे प्रवास करताना वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नाही आणि भीषण अपघात घडत आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने आता ग्रामस्थांचा संयम सुटला आहे.

या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केवळ रेलिंगच नव्हे, तर घाटातील संपूर्ण सुरक्षेचा प्रश्न मांडला आहे. घाटातील धोकादायक वळणांवर वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी वेगमर्यादेचे फलक लावणे आणि रात्रीच्या वेळी दिशा दर्शवण्यासाठी रिफ्लेक्टर बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याचबरोबर, घाटातील नैसर्गिक गटारांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. हा कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

शिष्टमंडळाने मांडलेल्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मळगाव घाटातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले लोखंडी रेलिंग बसवण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबतही विभागाकडून त्वरित तांत्रिक चाचपणी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांच्यासह वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, बाबुराव तेंडुलकर, लक्ष्मण नाईक, ज्ञानेश्वर सावंत, रिचर्ड डिमेलो यांसह मळगाव, माजगांव व वेत्येमधील कार्यकर्ते उपस्थित होते.