पाटपन्हाळे महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम
गुहागर प्रतिनिधी:
मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्षे वाणिज्य वर्गाचा सत्र सहाचा निकाल 14 मे रोजी जाहीर झाला त्यामध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयाने उत्तुंग असे यश मिळवून गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामध्ये महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचा निकाल हा 55% असून देखील महाविद्यालयाचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. यामध्ये कु. साळवी दीक्षा ज्ञानेश्वर 87.50 %, कु. आंबेकर अमृता दिलीप 87 %, कु. साळवी वैष्णवी मुरारी 82.50 % गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. सदर परीक्षेमध्ये एकूण 62 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 32 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. मिळालेल्या उत्तम अशा यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई यांनी विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत प्रा. कांचन कदम मॅडम, प्रा. सुभाष घडशी आणि प्रा. गजभिये लंकेश यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये शंभर टक्के निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांचा नियमित सराव, अतिरिक्त तास आणि वैयक्तिक लक्ष यामुळे इतके चांगले यश मिळाले असे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत यांनी सांगितले. या निकालाबद्दल पालकांनी आणि समाजातील विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर निकालामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. सदर निकाल हा महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील मैलाचा दगड ठरणार आहे.













