शिक्षक समिती शाखा खेडकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

खेड (प्रतिनिधी) : नुकताच जाहीर झालेल्या दहावी, बारावी तसेच जेईई मेन्स परीक्षांच्या निकालामध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीने गौरव करण्यात आला. शिक्षक समिती परिवारातील शिक्षकांच्या पाल्यांनी विविध परीक्षांमध्ये उज्वल यश मिळवत संस्थेचे नाव उंचावल्याने या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमामध्ये तनिष्का संजय सुर्वे, आर्या संजय सुर्वे, वेदांग मंगेश भावे, हिमांशू दिनेश पवार, अनुष्का रामकिसन वारे, श्रावणी श्रीकृष्ण खांडेकर, पवन पांडुरंग देवकते, रोहित राजाराम शिंदे, वेदिका महेश शेडगे, राधिका अमित रांगडे आणि पार्थ विजय चव्हाण या यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी शैक्षणिक आणि करिअर वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करत सातत्य, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश मिळवता येते, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षक समिती परिवाराचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह समितीचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.