पर्यटनातून स्थानिक विकासाला नवी दिशा : संतोष रोकडे
व्याजमुक्त व तारणमुक्त योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
कुणकेश्वर येथे आंबा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ
पर्यटनातून शाश्वत विकास साधता येऊ शकतो आणि यासाठी महाराष्ट्र शासन तसेच पर्यटन विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे यांनी केले. पर्यटन विभागाच्या ‘आई’सारख्या विविध योजनांमुळे महिलांना पर्यटन व्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतेही व्याज नाही, कोणतेही तारण नाही अशा अनेक योजनांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्लास्टिकमुक्त गाव आणि बहुभाषिक गाईड ही या भागाची गरज असून, स्थानिकांनी पुढाकार घेऊन पर्यटनातून स्वतःचा विकास साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र अनलिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कुणकेश्वर भक्तनिवास येथे आंबा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. फीत कापून या महोत्सवाचे उद्घाटन संतोष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वर गावचे सरपंच महेश ताम्हणकर, देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, किरण जाधव, भक्तनिवास व्यवस्थापक सिद्धेश चव्हाण, देवस्थानचे माजी अध्यक्ष संतोष लबदे, माजी सरपंच गोविंद घाडी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार शैलेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना एकनाथ तेली यांनी देवस्थानच्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना दिल्याचे सांगितले. आंबा महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत असून, पर्यटन महामंडळ आणि देवस्थान ट्रस्ट यांनी संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केल्यास भविष्यात आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असे त्यांनी नमूद केले. शासनाची इच्छा असल्यास पुढील महोत्सव संयुक्तपणे आयोजित करण्यास देवस्थान ट्रस्ट तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुणकेश्वर गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सरपंच महेश ताम्हणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच देवस्थानचे माजी अध्यक्ष संतोष लबदे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
आकर्षक मंडप, विविध सजावट आणि अनेक स्टॉल्समुळे आंबा महोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. पुढील तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार असून, आंबा विक्रीसोबत विविध प्रदर्शन व माहितीपर स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
या महोत्सवात पर्यटन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. दहावी-बारावीनंतर पर्यटन क्षेत्रातील उपलब्ध अभ्यासक्रम, विविध कर्ज योजना, विशेषतः महिलांसाठी असलेली ‘आई’ योजना, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पर्यटन खात्याच्या महत्त्वाच्या ‘न्याहारी, निवास आणि आहार’ योजनेसाठी नोंदणीची सुविधाही महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देवगड हापूससाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार असून, स्थानिकांना पर्यटन क्षेत्रातून विकासाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सागर जोईल यांनी केले.













