अनधिकृत LED व पर्ससीन मासेमारीस आळा घालण्यासाठी सातत्याने कठोर कार्यवाही : प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई करून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ तसेच सुधारणा अधिनियम २०२१ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राज्याच्या सागरी हद्दीत नियमित गस्त सुरू आहे. सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने प्रभावी गस्त घालून अनधिकृत LED व पर्ससीन मासेमारीस आळा घालण्यासाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार करून सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे. असे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने सदर बाबीची गंभीर दखल घेत तातडीने व सतर्कतेने पावले उचलली असून समुद्रात मासेमारी नौकांची कसून तपासणी सुरू आहे. मत्स्य व्यवसाय विभागाकडून किनारपट्टी क्षेत्रासह खोल समुद्रात देखील महाराष्ट्र राज्याच्या जलधि क्षेत्रात नियमित गस्त घालण्यात येत आहे.
असे असताना अनेकदा LED मासेमारीचे जुने फोटो अथवा नाईट व्हिजनमध्ये काढण्यात आलेले फोटो प्रसारित करून विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. सद्यस्थितीत मासेमारी हंगाम समाप्तीचा कालावधी सुरू असून मे अखेरचे खराब हवामान, समुद्रातील उंच लाटा व वादळी वाऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी गस्त करणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे तरीसुद्धा मत्स्य विभागामार्फत नियमित गस्त घालण्यात येत आहे. तसेच हंगामाचे शेवटचे दहा दिवस उरलेले असल्याने अनेक मासेमारी नौका बंद झालेल्या असून मोठ्या प्रमाणावर खलाशी आपल्या मूळ गावी परतण्याची लगबग सुरु झाली आहे. असे असले तरी बेकायदेशीर मासेमारीला कोणत्याही प्रकारची मुभा अथवा सॉफ्ट कॉर्नर दाखविण्यात येणार नाही.
तसेच प्रादेशिक हवामान विभागाकडून वेळोवेळी प्राप्त हवामान इशाऱ्यानुसार समुद्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असते अशावेळी हवामान अनुकूल होईपर्यंत जिल्ह्यातील मासेमारी नौकांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत कडक गस्त ठेवून अनधिकृत LED व पर्ससीन मासेमारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती कठोर कार्यवाही सातत्याने करण्यात येईल, असे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी नमूद केले.













