वालावल गावात पुढील ६ महिने करणार शेतीचा अभ्यास
कुडाळ । प्रतिनिधी :
मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE – Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमाअंतर्गत वालावल गावात दाखल झाले आहेत. हे कृषी दूत पुढील सहा महिने गावातच मुक्कामाला राहून स्थानिक शेती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि एकंदरीत ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करणार आहेत.
या मोहिमेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी वालावल ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी सरपंच श्री. राजेश प्रभू यांच्याकडे महाविद्यालयाचे अधिकृत पत्र आणि पुढील सहा महिन्यांच्या उपक्रमांची सविस्तर रूपरेषा सुपूर्द करण्यात आली. सरपंच श्री. राजेश प्रभू यांनी सर्व कृषी दूतांचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात स्वागत केले आणि या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आधुनिक शेती आणि सेंद्रिय पद्धतींवर राहणार भर
या सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक व्यवस्थापनाचे धडे देणार आहेत. बदलत्या हवामानात कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, आणि विविध शासकीय कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सरपंचांशी चर्चा करताना, आधुनिक शेतीचे महत्त्व प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कसे पोहोचवता येईल, याविषयीची आपली रणनीती स्पष्ट केली.
ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती
या प्रसंगी उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. स्मित कोळेकर, कु. अजित म्हसकर, कु. मनीष कमेरिया, कु. सोनू कुमार, कु. मयुरेश दळवी आणि कु. उज्वल तोंडळकर हे कृषी दूत उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. समीर चौधरी, श्री. कुलदिप खानोलकर, सौ. प्राजक्ता साळसकर आणि स्थानिक ग्रामस्थ श्री. भुषण पाटकर यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कृषी पदवी घेणारे हे तरुण विद्यार्थी थेट गावात येऊन मार्गदर्शन करणार असल्याने, वालावल परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र शिकण्याची मोठी संधी मिळणार असून, गावात उत्साहाचे वातावरण आहे.













