बिहारमधील कैमूर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 48 तासांत चार धडविरहित मृतदेह आणि शरीराचे विविध अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार मृतदेहांचे अवशेष जप्त केले असले तरी त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक तपास सुरू करत सर्व बाजूंनी चौकशी सुरू केली आहे.
चार धडविरहित मृतदेहांमुळे परिसरात भीतीचे वातावरण
कैमूर : बिहारमधील कैमूर जिल्ह्यात गेल्या 48 तासांत घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी चार धडविरहित मृतदेह आणि शरीराचे अवयव आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार मृतदेहांचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. मात्र, या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
माहितीनुसार, आभैदे गावाजवळ एका पोत्यामध्ये मानवी शरीराचे अवयव आढळले. या घटनेची माहिती मिळताच कैमूरचे एसपी हरिमोहन शुला आणि मोहनिया एसडीपीओ प्रदीप कुमार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध ठिकाणी शरीराचे अवयव आणि धडविरहित मृतदेह सापडले आहेत. 10 मे रोजी दुर्गावती नदीतून दोन अज्ञात मृतदेहांचे अवशेष जप्त करण्यात आले होते. त्यानंतर कर्मनाशा नदीच्या काठावर देखील मानवी शरीराचे काही भाग आढळून आले.
या सर्व घटनांचा परस्पर संबंध असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चौथ्या मृतदेहाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू केली असून पोस्टमार्टम अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
प्रहार डिजिटलशी बोलताना एसडीपीओ प्रदीप कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून प्रत्येक पुराव्याची बारकाईने तपासणी केली जात आहे.











