कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार; वडिलांनीच मुलांकडून करवून घेतल्या घरफोड्या

कल्याणमध्ये घरफोडीच्या मालिकेमागे अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या मुलांकडून घरांची रेकी करून चोरी करवून घेतल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २१ लाख ६० हजार रुपये किमतीचे १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे कल्याण परिसरातील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.


घरांची रेकी करून अल्पवयीन मुलांकडून चोरी

कल्याण : शहरात घडलेल्या घरफोडीच्या घटनांमागे अत्यंत धक्कादायक कट उघडकीस आला आहे. पोलिस तपासात वडिलांनीच स्वतःच्या मुलांकडून घरांची रेकी करून चोरी करवून घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

रामबाग लेन क्रमांक ४ येथील रहिवासी एम. अरविंद राजाराम यांच्या बंद घरात ८ मे २०२६ रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कैलास विलास भालेराव याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत १४ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले.

वडील आणि मित्रच निघाले मास्टरमाईंड

पोलिस चौकशीत या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार कैलास भालेरावचा वडील विलास भालेराव आणि त्याचा मित्र दीपक जाधव असल्याचे निष्पन्न झाले. हे दोघे विविध सोसायट्यांमध्ये काम करताना बंद घरांची माहिती गोळा करत होते. कोणत्या घरात कोणी नसते आणि कोणते घर बंद आहे, याची माहिती ते मुलांना देत होते.

अल्पवयीन मुलांकडून चोरी करून आणलेले सोन्याचे दागिने हे आरोपी स्वतःकडे घेत होते. त्यानंतर त्या दागिन्यांची विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी या प्रकरणात १८ तोळे वजनाचे अंदाजे २१ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

तपासादरम्यान आरोपींनी कल्याण परिसरातील आणखी तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्यामुळे एकूण चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस करत आहेत.