लांजा ( प्रतिनिधी): शहरातील साई समर्थ रेसिडन्सी येथून ४२ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत लांजा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव चंद्रकांत चोरगे (वय ४२, रा.साई समर्थ रेसिडन्सी एफ विंग रूम नं.१०३, लांजा, ता.लांजा, जि.रत्नागिरी) हे व्यक्ती गुरुवारी १४ मे रोजी रत्नागिरी एसपी ऑफिस येथे बोलावले आहे. त्यासाठी मी रत्नागिरी येथे जाणार आहे, असे सांगून दुपारी दीड वाजण्याच्यापूर्वी आपल्या मालकीची नॅनो गाडी क्रमांक (एमएच.०४.एफझेड.०३३०) घेऊन निघून गेले. त्यानंतर त्यांचा आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांमध्ये सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र ते आढळून न आल्याने अखेर त्यांची पत्नी अस्मिता वैभव चोरगे (वय ४१, रा. लांजा, ता.लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.
बेपत्ता झालेल्या वैभव चोरगे यांची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच, चेहरा उभट, रंग सावळा, केस काळे, नाक सरळ तर अंगावर फुल शर्ट, फुल पँट व पायात ब्राऊन कलरची सँडल, हातात घड्याळ, गळ्यात चांदीची चैन असे त्याचे वर्णन असून सोबत पांढऱ्या रंगाची (एमएच.०४.एफझेड.०३३०) क्रमांकाची नॅनो गाडी आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉन्स्टेबल विकास पवार करत असून संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.











