सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
चिपळूण (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या ऑनलाईन (ई-चलन) कारवाईबाबत छोट्या प्रवासी वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाच्या परिवहन नियमांनुसार वाहनांवर ई-चलन कारवाई करताना वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. बॉडी कॅमेरा नसल्यास दंड आकारू नये, वाहतूक कारवाईत पारदर्शकतेसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेऊन स्पष्ट निर्देश दिलेले असताना देखील मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस बॉडी कॅमेरा न वापरताच कारवाई करत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या वाहतूक पोलीस यांना वाहनांवर ई-चलन करताना बॉडी कॅमेरा वापरणे बंधनकारक या निर्णयाची वाहतूक पोलिसांकडून अंमलबजावणी अद्याप ही होताना दिसत नाही.
कोकणात जाणाऱ्या छोट्या प्रवासी वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून मोठ्या रक्कमेची नाहक ई-चलन ऑनलाईन दंड आकारणी केली जात असल्याने चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.वरिष्ठ स्तरावरून योग्य नियंत्रण नसल्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया सुरू असल्याचा आरोपही वाहन चालकांकडून होत आहे.त्यामुळे छोट्या प्रवासी वाहन चालकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान,मुंबई-गोवा महामार्गावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे.वाहतूक कोंडी सोडवणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे ही वाहतूक पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना,प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यातच अधिक लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री यांनी वरिष्ठ स्तरावरून गंभीर दखल घेऊन या प्रकरणी चौकशी करून योग्यती कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच वाहन चालकांना होत असलेला त्रास थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी छोट्या प्रवासी वाहन चालकांच्या वतीने करण्यात येत आहे.












