रत्नागिरी शहरात घरफोडी; तब्बल ४ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ४ लाख ८ हजार १९२ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.  

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार रामचंद्र पाडावे (वय ३२, रा. मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी, रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १६ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून १७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप लोखंडी रॉडच्या सहाय्याने तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा उचकटला व लोखंडी कपाटातील लॉकर फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले.  

चोरीस गेलेल्या ऐवजात ५० हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे अडीच लाखांचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, कानातील टॉप्स, सोन्याची चैन, बेबी रिंग आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ४ लाख ८ हजार १९२ रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.