चिपळूण नगर परिषदेकडून ९० टक्के गटार व नालेसफाई पूर्ण तर महावितरणकडून पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न!

चिपळूण /संतोष सावर्डेकर:

पावसाळ्यात आपत्तीला सामोरे जावू लागू नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आपल्या जातात चिपळूण नगरपरिषदेकडून गटार, नाले सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून ९० टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. तर महावितरणकडून देखील पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा राहण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे.

चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात गटार व नाले असल्याने ही सफाई मोहीम दरवर्षी पावसाळ्यापूर्वी हाती घ्यावी लागते. गटार व नाल्यांमध्ये माती सदृश भराव निर्माण होत असल्याने ही सफाई मोहीम हाती घेणे गरजेचे ठरते. काही वेळा गटार व नाल्यात भरावा राहिला गेला तर पावसाळ्यात गटार व नाले ओसंडून वाहून सदरील पाणी रस्त्यांवर अथवा काहींच्या घरात शिरल्याचे देखील काही वेळा आपल्याला पहावयास मिळाले आहे. यातून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो. यावर्षी पावसाळ्यापूर्वी चिपळूण नगर परिषदेने गटार व नाले सफाई मोहीम हाती घेतली आहे. भोगाळे, मध्यवर्ती बसस्टॅन्ड, गोवळकोट,पेठमाप, खेंड, बाजारपेठ आदी परिसरातील गटार व नाले सफाई करण्यात आली आहे. ही मोहीम ९० टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य सभापती शुभम पिसे व निरीक्षक वैभव निवाते यांनी दिली आहे. शहरातून वाहत असलेल्या शिवनदीतील गाळदेखील काढण्यात आला असून ही नदी पावसाळ्यात प्रवाहित राहण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे. या कामांवर नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती शुभम पिसे व निरीक्षक वैभव निवाते, सुजित जाधव आदींनी विशेष लक्ष ठेवले होते. याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील नगरपरिषदेकडून नियोजन केले जात आहे.

तर दुसरीकडे महावितरणकडून देखील कृती आराखडा करण्यात आला असून पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यात महावितरणची वीज गुल होणार नाही, याची काळजी येथील अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. सध्या अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावत असून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात ग्राहक विजेअभावी अंधारात राहू नयेत यासाठी महावितरण कडून उपाय योजना सुरू झाल्या आहेत. धोकादायक झाडांची कटाई सुरू झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा त्वरित आणि प्रभावीपणे सामना करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ओईल विद्युत खांब इन्सुलिटर्स आणि इतर महत्त्वपूर्ण घटकांसह आवश्यक साहित्य आणि उपकरणांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत.

मान्सूनपूर्व कामांतर्गत सर्व उच्च दाब व लघुदाब वाहिन्यांच्या लोंबकळणाऱ्या तारा, झुकलेले खांब, खराब झालेले इन्सुलेटर्स, सदोष स्टे वायर यांची दुरुस्ती सुरू आहे. ताराना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू आहे. वितरण रोहित्रांची संरचनात्मक स्थिती व ऑइल लिकेज तपासण्याचे काम सुरू आहे. आवश्यक त्या ठिकाणी एबीस्विचेस लाईटनिंग अरेस्टर व्यवस्थित बसवल्याची खात्री करण्याचे काम सुरू आहे. उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, ब्रेकर्स, सिटी- पिटी युनिट्स, प्रोटेक्शन रिले आणि संबंधित उपकरणे सुस्थितीत असल्याची खबरदारी करून घेतली जात आहे. रिंग मेन युनिट व वितरण पेट्यांची गरजेनुसार दुरुस्ती करून घेतली जात आहे. चिपळूण शहरात दोन ट्रान्सफॉर्मर होते. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी तिसरा ट्रांसफार्मर चार्ज करून घेण्यात आला आहे. मुरादपुर येथील फिडर लोटे येथील फिडरला जॉईंट होता. त्यामुळे या फिडरवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होत होता आता. मुरादपूरचा फिडरही स्वतंत्र करण्यात आला आहे. त्यामुळे या फिडरवर अवलंबून असलेल्या ग्राहकांची कमी दाबाची समस्या दूर होणार आहे. एकंदरीत पावसाळ्यात वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्याच्या दृष्टीने महावितरण कडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर महसूल विभागाकडून देखील आपत्ती व्यवस्थापन आराखडा नियोजित असून त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.